मनोगत
स्तोत्रांचा अनुवाद ही माझ्या मनाची निकड होती; आणि एकदा एखादी गोष्ट माणसाची गरज झाली की ती मिळविल्याशिवाय तो स्वस्थही बसत नाही. यमक, अनुप्रास इत्यादि उत्तमोत्तम अलंकार घालून संस्कृतची अनेक सुंदर सुंदर स्तोत्र-शिल्पे माझ्यासमोर मांडून ठेवलेली असत. पण माझं संस्कृतचं प्रगाढ अज्ञान ह्या अवगुंठनाने ती कायम झाकलेलीच राहत. कधी वार्याने थोडासा पडदा हलावा आणि त्या सुंदर मूर्तीची सुबक पावले दिसावीत तसा कधी तरी थोडासा अर्थ कळताच मी त्याच्या सौदर्याने भारावून जात असे. त्याच वेळी कै. पांडुरंगशास्त्री गोस्वामी यांचे श्री शंकराचार्यांच्या स्तोत्रांचे सटीक सविस्तर भाषांतर असलेले `सुबोध स्तोत्र संग्रहा'चे दोन भाग हाती आले. त्यांचा अध्यात्माचा गहन अभ्यास, संस्कृतवरील प्रभुत्व आणि मराठी भाषांतर वाचून, ही सर्व स्तोत्रे वृत्तबद्ध होऊन माझ्या माय मराठीतही आली पाहिजेत असे वाटले. ही सुंदर स्तोत्रे मराठीत त्याच चालीत म्हणता यावीत असे वाटले.
पुढे वाचा..